नवी दिल्ली : तमिळनाडूच्या निवडणुकीत चमत्कारिक यश संपादन करणार्या थलपती विजय यांच्या टीव्हीके पक्षाने सर्वाधिक १०८ जागांवर विजय मिळवत, सर्वात मोठा पक्ष होण्याचा बहुमान मिळवला. पण, टीव्हीकेला बहुमताचा आकडा पार करता आला नसल्याने सत्ता स्थापनेसाठी विजय यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. यासाठी आता हालचाली सुरु झाल्या असून, टीव्हीकेने डीएमकेबरोबर युतीत लढलेल्या काँग्रेसला साद घातली आहे. टीव्हीकेच्या हाकेला काँग्रेसने मंत्रिपदाच्या अटींने प्रतिसाद दिल्याची माहिती सूत्रांच्या हवाल्याने समोर आली आहे.
तमिळनाडू विधानसभेच्या निवडणुकीत थलपती यांच्या दमदार विजयामुळे सर्व राजकीय समीकरणे बदलून गेली आहेत. निकालानंतर राज्याच्या राजकारणात अनेक नाट्यमय घडामोडी पाहायला मिळत आहेत. टीव्हीके पक्षाने सत्तास्थापनेसाठी हालचाली सुरु केल्या असून, बहुमताचा आकडा पार करण्यासाठी त्यांना काँग्रेसह डाव्या पक्षांना बरोबर घ्यावे लागणार आहे. विजय यांनी यासाठी प्रयत्न सुरु केले असले तरी ज्यांना बरोबर घ्याचंय ते पक्ष युती धर्मात अकडले आहेत. पण, काँग्रेसने निवडणूकपूर्व युती तोडण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे.
काँग्रेच्या बैठकीत महत्वाचा निर्णय
टीव्हीकेबरोबर संभाव्य युतीवर चर्चा करण्यासाठी काँग्रेसने व्हर्च्युअल बैठक आयोजित केली होती. या बैठकीत टीव्हीकेला पाठिंबा देण्याबाबत ठराव मंजूर करण्यात आला आहे. २०२६ च्या विधानसभा निवडणुकीत पाच जागा जिंकलेला काँग्रेस पक्ष दोन कॅबिनेट जागा आणि सरकारी मंडळांच्या काही अध्यक्षपदांची मागणी करण्याची शक्यता आहे. बुधवारी काँग्रेस समर्थनाचे पत्र टीव्हीकेला सादर करण्याची शक्यता आहे. यानंतर पक्षाचे सर्व आमदार विजय यांची भेट देखील घेतील असे सांगितले जात आहे. याच बैठकीत संभाव्य युती आणि सरकार स्थापनेबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.
युतीचा निर्णय झाला?
टीव्हीके आणि काँग्रेस यांच्या युतीबाबत जवळपास निर्णय झाला असून, पक्ष नेतृत्वाने याबाबत विजय यांना कळवले आहे, असेही इंडिया टुडेच्या वृत्तात म्हटले आहे. थलपती विजय ०७ मे रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. विजय यांच्याबरोबर सात कॅबिनेट मंत्री देखील शपथ घेतील अशी माहिती आहे. २३४ सदस्य संख्या असलेल्या विधानसभेत ११८ बहुमताचा आकडा असून, विजय यांना सत्तास्थापनेसाठी १० जागांचा आवश्यकता आहे.
काँग्रेसने पाठीत खंजीर खुपसला डीएमके
विजय यांच्या टीव्हीकेबरोबर जाण्यासाठी काँग्रेसमध्ये हालचाली सुरु झाल्यानंतर एम. के. स्टॅलिन यांच्या डीएमके पक्षाने काँग्रेसवर जोरदार टीका केली. एनडीटीव्हीला दिलेल्या एका विशेष मुलाखतीत डीएमकेचे प्रवक्ते सरवणन अण्णादुराई यांनी काँग्रेसने ङ्गपाठीत खंजीर खुपसलाफ अशी टीका केली. डीएमके बरोबर युती केल्यामुळे पाच जागा जिंकता आल्या अन्याथा एकाही जागेवर विजय मिळवणे कठीण होते, असा टोला अण्णादुराई यांनी लगावला. भाजपा आणि मोदी यांच्याविरोधात एकही शब्द न बोलणारा टीव्हीके भाजपाच्या जवळचा आहे, असेही अण्णादुराई म्हणाले.
डाव्यांशी देखील चर्चा
काँग्रेस व्यतिरिक्त, आघाडीसाठी संख्याबळ मिळवण्याकरिता टीव्हीके डाव्या पक्षांशी आणि व्हीसीके, सीपीआय(एम), सीपीआय, आणि आययूएमएल यांसारख्या इतर लहान प्रादेशिक पक्षांशीही चर्चा करण्याच्या शक्यता पडताळून पाहत आहे. या पक्षांना लवकरच निमंत्रणे पाठवली जाण्याची शक्यता आहे, असे सूत्रांनी सांगितले. जर काँग्रेस आणि इतर लहान पक्षांनी टीव्हीकेसोबत युती करण्याचा निर्णय घेतला, तर विजय यांचा पक्ष सरकार स्थापन करण्यासाठी आवश्यक असलेला बहुमताचा आकडा सहजपणे करु शकतो. व्हीसीके आणि डावे पक्ष फुटून विजय यांच्या नेतृत्वाखालील आघाडीत सामील होणार नाहीत, असा विश्वास डीएमकेने व्यक्त केला आहे.